(
Prahar Artcile)
आदिम, आदिवासी जमातीची संस्कृती कला म्हणजे
अनमोल असा ठेवा आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशा काही कला आहेत; पण
त्याचे जतन, संवर्धन याबाबत फार मोठा प्रश्न उभा आहे. परंतु
पिंगुळी गावातील आदिवासी ठाकर समाजाची चित्रकथी ही कला जाणीवपूर्वक जोपासण्याचे
कार्य गेली कित्येक र्वष परशुराम गंगावणे करीत आहेत आणि तोच वारसा त्यांचे चिरंजीव
चेतन गंगावणे पुढे नेत आहेत.
रामायण, महाभारतातील
पौराणिक कथांवर आधारलेली चित्रे दिव्यासमोर आणून संवादानुसार ती पात्रे चक्क बोलू
लागतात. आजच्या थ्रीडी चित्रांप्रमाणे चित्रकथेचे चित्रपट जणू साकार होते.
दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पिंगुळी
गावात सुमारे १०० घरे आहेत. राधा नृत्य, पोतराज, गोंधळ, चित्रकथी,
पोवाडा,
स्त्रियांचे
पारंपरिक खेळ यासारखे अकरा लोककला प्रकार पूर्वीपासून चालत आले आहेत. पूर्वी काष्ठ
शिल्पे, बाहुल्या आदी विशिष्ट कलेची निर्मिती केली जायची; परंतु
परशुराम गंगावणे यांनी सुमारे अडीचशे चित्रे जतन केली आहेत. म्हणूनच सरकारने दखल
घेत दक्षिण- मध्य सांस्कृतिक समितीवर त्यांची नियुक्ती केली.
त्या माध्यमातून देशभरातील आदिवासी
चित्रकारांच्या कलाकृतींचे मूल्यांकन करण्याचे काम त्यांनी केले आहे. पिंगुळी
गावात ‘ठाकर आदिवासी कलांगण’ स्थापन केले त्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी
प्रभाकर पणशीकर आणि विजया मेहता हे मान्यवर आले होते. ठाकर आदिवासी समाजाचा
गौरवशाली इतिहास शिवकाळाशी निगडित आहे. शिवाजी महाराजांच्या दरबारी आश्रय दिला
जाई.
प्राचीन काळी कुडाळ येथील देवीच्या देवळात
नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम होत असत. शिवाजी महाराजांनंतर मात्र या समाजाचा आश्रय
गेला. पुढे सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेबांनी या कलांना मदत दिली होती. काही गावे
खेळ करण्यासाठी नेमून दिली होती. परंतु अजूनही प्रसार ज्याप्रमाणे झाला त्या प्रमाणात
आमच्या कला मागे राहिल्या ही खंत चेतन यांना वाटते.
सुमारे तीनशे वर्षापूर्वीच्या चित्रांच्या काही
पोथ्या ठाकर आदिवासींनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. चित्रकथी सादरीकरणासाठी किमान
तीन कलाकारांचा समावेश असतो. या सादरीकरणाला पोथी सोडणे असे संबोधतात. मधोमध
बसलेल्या कलाकारच्या हातात टाळ, त्याच्या शेजारी बसलेल्या दुस-याच्या
हाती दुडुक जे डमरूसारखे भासणारे आणि हाताने वाजवायचे वाद्य असते आणि तिसरा फक्त
कोरस संगीत देतो.
सादरीकरण करणा-या कलाकारांची वेशभूषा धोतर
त्यावर सफेद कुर्ता जॅकेट असा असतो. १२ इंच कागदावर चित्रे काढलेली असतात. यासाठी
वापरण्यात येणारा रंग निसर्गातील वनस्पतीच्या साली, पाने, फुले,
माती
यापासून तयार केलेले होते. विशेषत: प्राचीन काही चित्रे झाडांच्या मोठमोठय़ा
पानांवर काढली जात असत.
सोमेश्वराच्या ‘मानसोल्हासा’मध्ये
उल्लेख असलेली ‘चित्रकथी’ म्हणजेच
चित्रांद्वारे कथन केली जाणारी कथा होय. विघ्नहरासी गाई एकदंता, देवा
दौरी हराचिया सुता सकळसरसी गुणगाता, तुझे चरणी नमन माझे सकळ देवांशी वंदू
आणि तू दाविसी ज्ञानमार्गीचा इंदू
यथोनिया परिबंधू मज मति द्यावी विघ्नहरा या
स्तवनाने ‘चित्रकथीला’ प्रारंभ केला जातो.
गणपतीचे चित्र, बाजूला
रिद्धी-सिद्धी असे पान दाखवून त्या पानामागील सरस्वतीचे पान दाखवून ‘चित्रकथी’ला
ख-या अर्थाने सुरुवात होते. आजच्या पिढीला या प्राचीन ठेव्याची ओळख व्हावी म्हणून
पिंगुळी येथे आर्ट गॅलरीची स्थापना केली. या समाजात गंगावणेप्रमाणे माजगे, मस्के,
रणसिंग,
आटक,
वाकडे,
ठोमरे
अशी आडनावे असतात. पूर्वी हा समाज जंगलात राहात असे, आता मात्र नागर
जीवनात या कला कळाव्या म्हणून महाभारत, रामायणचा आधार घेऊन चित्रकथी समोर आली.
चित्रकथी ही कळसूत्री बाहुल्यांचा आधार घेऊनही
दाखविली जाते. रामायणावर आधारित चित्रकथी असेल तर प्रथम मुसाफिर हे विनोदी पात्र
रंगमंचावर येते. देवता येते, त्यानंतरच राम-लक्ष्मण यांना घेऊन ऋषी
विश्वामित्राचे आगमन होते. पाठोपाठ स्वर-दूषण या सेनापतीसह रावण येतो. यात दोन
नर्तिकाही नृत्य सादर करतात. आधुनिक काळात मानवाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.
स्त्री-भ्रूण हत्यासारखे विषय घेऊनही प्रबोधन
करतो. या खेळात तीस बाहुल्यांचा समावेश असतो. अशा प्रकारे कळसूत्री
बाहुल्यांमार्फत जवळजवळ १०० प्रयोग केले आहेत. कोलकाता, मुंबई आणि बाहेर
अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. या चित्रकथीचा प्रभाव राजस्थान, कर्नाटक,
आंध्र
येथील कला प्रकारांवर झाला आहे. चित्रकथी सादर करणा-या ठाकर लोककला कलाकारांपैकी
पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांच्याकडे १० पोथ्या सध्या आहेत.
त्यातील काही आताच्या आणि काही ३०० ते ३५०
वर्षापूर्वीच्या आहेत. काही पोथ्यांची स्थिती आता अतिशय दयनीय आहे. त्यामुळे त्या
हाताळताना काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. काहींचे तर रंग उडाले आहेत. मराठय़ांच्या
राजवटीत ठाकर आदिवासी कलेकडे शिवरायांचे लक्ष गेले आणि ख-या अर्थाने राजाश्रय
लाभला होता.
शिवाजी महाराजांनी ठाकर बांधवांना दरबारात
बोलावून सादरीकरणासाठी प्रत्येक कुटुंबीयांना काही गावे नेमून दिली होती. त्यावेळी
मळेवाडी, गुळडुवे, आरोंदा, तळवडे ही गावे
परशुराम गंगावणेच्या पूर्वजांना देण्यात आली होती.
चित्रकथीचे सादरीकरण करण्यासाठी जायचे आणि अनेक
मुलखात संचार करताना शत्रू पक्षाच्या गोटातील अनेक गुपिते शिवाजी महाराजांपर्यंत
पोहोचवायची या त्यांच्या गुप्तहेरगिरीसाठी जमिनी ठाकर आदिवासींना इनाम म्हणून
लाभलेल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात इनाम गावातील
वाडय़ात वाडीप्रमुखाच्या घरी सायंकाळी जाऊन चित्रकथी सादर केली जाते. दुस-या दिवशी
सकाळी वाडीत घरोघरी जाऊन वाडीतील लोकांनी दिलेले धान्य, कोकम, नारळ,
मिरची,
काजू
या वस्तू किंवा रोख रक्कम गोळा केली जाते.
परशुराम गंगावणेची दोन मुले चेतन आणि एकलव्य ही
मुले आताच्या पिढीला कला समजावी म्हणून प्रयत्न करत आहेत. प्रदर्शने भरविणे,
सामाजिक
कार्यक्रमातून चित्रकथी सादर करणे. भारत सरकारच्या गुरू-शिष्य परंपरा या योजनेसाठी
परशुराम गंगावणेची निवड झाली आहे. शिवाय आता शिबिरे घेऊन तरुण पिढीला या कलेचे
ज्ञानही दिले जाते.
शिवाय आता जे म्युझियम आणि आर्ट गॅलरीची
स्थापना केली आहे तिथे पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून झोपडीवजा जागेत वेगवेगळी
पेंटिंग्स लावली आहेत. शिवाय मातीची मडकी, सूर, नांगर, अवजारे
या वस्तूही शहरातील लोकांना बघायला मिळावे म्हणून आयोजन केले आहे. शिवाय जमीन
शेणाने सारवलेली आहे. त्यामुळे प्राचीन वातावरण तयार केले आहे. पर्यटकांसाठी वेगळे
काहीतरी बघायला मिळेल आणि या कलेचे जतन होण्यासाठी मदत होईल अशी आपण आशा करू आणि
गंगावणे कुटुंबाला शुभेच्छा देऊ!
For more details
Chetan Parshuram Gangavane
9987653909
website- www.pingulichitrakathiart.com
Comments
Post a Comment