एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली...